ढाकोबा शिखर - दुर्ग शिखर ट्रेक माहिती

TRAVEL & TALES

10/19/20251 min read

View of the trekking route from Konkan Region

View of the trekking route from Plateau Region

· चालण्याचे अंतर: १४ किलोमीटर

· चालताना लागलेला चढ: ७२० मीटर

· चालताना लागलेली उतरण: ४०० मीटर

'दुर्गम, ‘मनुष्यवसतीविरहित’ ह्या शब्दांची अनुभूती घ्यायची असेल तर ढाकोबा ते दुर्ग हा ट्रेक नक्की करावा. उंचच उंच शिखरे, खोल आणि दूरवर पसरलेल्या दऱ्या, दाट जंगलं , धबधबे, जलकुंड आणि प्राचीन मंदिरं असे सगळे अनुभव देणारा हा ट्रेक! अश्या ह्या ठिकाणी आपण भारतीय असल्याचा आणि खासकरून महाराष्ट्रीय असल्याचा सार्थ अभिमान जागा नाही झाला तर शप्पथ! Patriotic movies मध्ये 'This is my land' अथवा 'This is worth fighting for' अश्या आशयाचे संवाद आपण नक्कीच कधीतरी ऐकले असतील. हा ट्रेक केल्यानंतर अश्याच काही भावना मनात येऊन गेल्या.

असो , आता आपण सुरुवातीपासून सुरुवात करूयात :-)

ज्ञान प्रबोधिनी पालक किल्ले भ्रमंती गटातर्फे १२ ऑक्टोबर २०२५ रोजी ढाकोबा ते दुर्ग ह्या ट्रेक चे आयोजन करण्यात आले होते. ह्यासाठी, पहाटे सव्वा पाच वाजता सोळा जणांचे बस मधून जुन्नर च्या दिशेने प्रयाण सुरु झाले. रविवार असल्याने त्यातून लवकर निघाल्याने फारशी रहदारी लागता आम्ही जुन्नर ला दोन तासात पोहोचलो. ST स्टॅन्ड समोरील मोरे खानावळीत मिसळ पाव आणि चहा असा नाश्ता करून, वाटेत केळदरे ला आमचे वाटाडे 'बोधा' दादांना पिक-अप करून आम्ही नऊ च्या सुमारास आमच्या गंतव्य ठिकाणी (आंबोली गावात) पोहोचलो.

आंबोली हे गाव तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. कोकणातून दाऱ्या घाट मार्गे सह्याद्रीची खडी भिंत चढून पठारावर आल्यावर लागणारे हे पहिले गाव. गाव तसे लहानसेच. बदलत्या काळानुसार इथल्या स्थानिकांनीही पोटापाण्यासाठी पुणे मुंबई चा रस्ता धरला असल्याने गावात जास्त प्रमाणात वसतीला वयस्कर मंडळीच उरली आहेत. ह्या गावातून ढाकोबा डोंगरमाथा दोन एक टेकड्यांपलीकडे असल्याचे भासते. भासते ह्या शब्दाचा प्रयोग जाणीवपूर्वक ह्यासाठी केला कारण 'दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं' ह्याचा प्रत्यय पुढे ह्या टेकड्या चढताना आला.

बस प्रवासात बऱ्याच मंडळींनी झोपेची थकबाकी वसूल करून घेतली असल्याने अगदी उत्साहवर्धक असा 'नमस्ते' घेऊन ढाकोबा शिखराकडे आम्ही मार्गस्थ झालो. सुरुवातीलाच अवघ्या दहा एक मिनिटांच्या चाली नंतर एक सुंदर असा धबधबा लागला. पावसाचा जोर कमी झाला असल्याने पाण्याचा प्रवाह अंमळ कमीच होता.

तिथे थोडा वेळ फोटो काढण्यात आले आणि मग टेकडी चे चढण सुरु झाले. थोडी उंची गाठल्यावर 'दाऱ्या घाटेची वाट दिसेल' आणि 'ढाकोबा शिखराचे पठार लागेल' हे दोन्ही समज फोल ठरले. एक टेकडी संपते तोच दुसरी टेकडी लपंडाव खेळताना "भॉ" केल्यासारखी समोर उभी ठाकायची. ह्या दरम्यान एक छानशी गुहा बघायला मिळाली. गुहे वरून पाण्याचा एक झरा पडत असल्याने सगळ्यांना ताजे तवाने होण्याची संधी मिळाली (ह्याच झऱ्याचे पाणी पुढे खाली जाऊन आधीच्या धबधब्याला मिळत असावे). सरते शेवटी पावणेदोन तासांच्या पायपिटीनंतर ढाकोबा चे शिखर आणि त्याच्या खालचे पठार दृष्टीक्षेपात आले!

ह्या पठारावर दाट जंगल आहे. त्यातून जाणाऱ्या वाटेमुळे उन्हाचा त्रास अजिबातच झाला नाही. पठारापासून शिखरापर्यंत पोहोचायला जेम तेम अर्धा तास लागला. शिखरावर पोहोचलो आणि सभोवतालचे दृश्य बघून डोळ्यांचे पारणे फिटले! ह्या शिखराच्या उजव्या हाताला जीवधन किल्ला, वानरलिंगी सुळका, लगतचे नाणेघाटाचे पठार आणि त्या पल्ल्याड घाटघर, हरिश्चंद्रगड आणि बरच काही दिसत होतं. डाव्या हाताला दुर्ग डोंगर, गोरखगड, मच्छिन्द्रगड, अहुपे घाट असा विस्तीर्ण प्रदेश दिसत होता! मागच्या दोन-सव्वादोन तासांच्या पायपिटीचे चीज झाले होते :-)

जेवणासाठी शिखर उतरून खालच्या पठारावरच्या ढाकेश्वर मंदिरात जाण्याचे आधीच ठरले होते. त्यामुळे जास्त वेळ दवडता सगळ्यांनी फोटो / सेल्फी काढले आणि बोधा दादांच्या मागे मागे आम्ही चालायला लागलो. येण्याच्या वाटेनी परतलो तर घसरडी वाट लागेल असे जाणवल्याने बोधा दादांनी एक दुसरी - अरुंद पण जिथे पावलांना पकड मिळेल - अशी वाट शोधली होती. त्यावरून चालत आम्ही अर्ध्या तासात मंदिरा जवळ येऊन पोहोचलो.

वाटेत एके ठिकाणी थोडा सडका- कुजका दुर्गंध येत होता. कशामुळे येत होता ह्याचा कयास बांधायची गरजच पडली नाही कारण पायवाटेपासून काही फुटांवरच झाडी मध्ये एका रेड्याचे शव पडले होते. आता अश्या निर्जन ठिकाणी मृत रेड्याला पाहून त्याला सावज बनवणारा हट्टा-कट्टा बिबट्या फार लांब नसावा ह्या कल्पेनेने सगळेच सावध झाले. मात्र मोठ्या ग्रुप मध्ये असल्याने तसे घाबरण्याचे काही कारण नव्हते.

ढाकेश्वर मंदिरा जवळ पोहोचलो तर तिथे काही ग्रामस्थ बसल्याचे दिसले. मंदिरात महिलांना प्रवेश नसल्याचे त्यांनी सांगितल्यावर आम्ही जवळच काही डेरेदार वृक्षांच्या सावलीत ठिय्या मांडला. कडकडून भूका लागल्या होत्या आणि आणलेल्या खाऊ सामग्रीची देवाण घेवाण सुरु झाली. अर्ध्या तासात पोटोबा भरले आणि ट्रेक च्या शेवटच्या टप्प्याकडे आम्ही वळलो.

ह्या मंदिरापासून दुर्ग शिखराकडे जाणारी वाट सौम्य चढ उताराची आहे. वाटेत बरीच पिवळी सोनकीची फुलं ह्यांनी व्यापलेले गवताचे गालिचे लागले. दोन एक ओढे देखील लागले जिथे पाण्याच्या बाटल्यांचे रिफील झाले. प्रो टीप: उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून बऱ्याच जणांनी माने भोवती ओला रुमाल / टॉवेल ठेवला होता. ह्या वाटेवर चालत असताना ढाकोबा चे शिखर अधून मधून दिसत होते. शब्द कमी पडतील असे लँडस्केप होते तिथे!

आम्हाला आंबोली गावात सोडून आमचा बस ड्राइवर गजानन हा दुर्ग शिखराच्या पायथ्याशी येणार होता. हा रस्ता घाटातून वळणा वळणा चा होता आणि वाटेत मोबाइलला रेंज नसल्याने तो व्यवस्थित पोहोचेल का असा एक प्रश्ण मनात होता. दुपारी साडेतीन च्या सुमारास आम्ही दुर्ग ला पोहोचलो आणि तिथे पार्क झालेली आमची बस बघून मनात सुटकेचा निःश्वास टाकला :-)

आधी दुर्ग शिखराच्या जवळच असलेल्या दरीला भेट देऊन कोकण दर्शन झाले. नंतर काही उमेदवारांनी दरीच्या कडे कडे नी चालत जाऊन रिठ्याचे दार ही घाट वाट दिसते का हे शोधण्याचे काम केले तर काहींनी सावली शोधून जमिनीला पाठ टेकवून गहन मनन चिंतन केले :-) सगळे जण पुन्हा एकत्र जमल्यावर नंतर पायथ्याच्या मंदिरात दुर्गा देवी च्या मूर्ती चे दर्शन घेतले. इथून दुर्ग शिखर हे १० मिनिटांच्याच चढावर होते. शिखरावर य प्रमाणात काळे मोठ-मोठे दगड सर्वत्र पसरले आहेत. बोधा दादांच्या म्हणण्यानुसार तिथल्या ग्रामस्थांचा असा समज आहे की हे दगड पांडवांनी इथे आणून ठेवले होते. उद्द्येश्य हा की अश्या वास्तूची निर्मिती व्हावी की ज्याची सावली थेट जुन्नर मधील शिवनेरी किल्ल्यावर पडावी!

मंद गार वारा, निळे आकाश, दूरवर दिसणारे ढाकोबा शिखर, सभोवतालचा हिरवा कंच सह्याद्री - सगळं इतकं छान होतं की सूर्यास्त पाहूनच परतावे असा मोह कोणासही व्हावा. पण वेळेचे भान राखून सगळी मंडळी दहा एक मिनिटातच खाली उतरायला लागली. ट्रेक संपत आला होता, ऑफिस / काम खुणावायला लागले होते. एक सुखद आठवण उराशी बाळगून सोळा जणं पुन्हा बस मध्ये येऊन बसलो. परतीच्या वाटेवर पुन्हा एकदा जुन्नर ला मोऱ्यांकडे थोडे खाणे करून, गप्पा मारत, गाणी गात आम्ही मंडळी साडे नऊ च्या सुमारास कर्वे नगर ला पोहोचलो. अश्या प्रकारे, अजून एका दर्जेदार ट्रेक ची सांगता झाली.

काही अप्रतिम जागांचे दर्शन घडवल्याबद्दल आयोजकांचे (विषेशतः सिद्धेश, केयूर, मंदार, रवींद्र, सचिन आणि मिलिंद ह्यांचे) मनःपूर्वक आभार !